आटपाडी दि . २० (प्रतिनिधी )
नियोजित माणदेश जिल्ह्याचे जिल्हा ठिकाण आटपाडीच व्हावे . या मागणीचा पुनर्रूच्यार आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक यांनी केला .
१९८७ - ८८ पासून विविध व्यासपीठे, वर्तमान पत्रातून या मागणीसाठी सातत्याने आवाज उठवित आलेल्या सादिक खाटीक यांनी नुकतेच ११ जानेवारी रोजी या संदर्भात विस्तृत लिखाण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते .
राज्यात नव्याने निर्माण होणाऱ्या अनेक जिल्हयात माणदेश जिल्ह्याचा समावेश असल्याच्या वार्तेने आटपाडी तालुक्यात, माणदेशात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे . या पार्श्वभूमीवर आपले अनेक वर्षाच्या स्वप्नाला वास्तवात येण्याचा महुर्त लागतो आहे . हे लक्षात घेऊन सादिक खाटीक यांनी राज्यातील असंख्य मान्यवर महोदयांचे याकडे लक्ष वेधून घेतले आहे .
शंभर वर्षे मागास, उपेक्षित, वंचित राहीलेल्या आटपाडीचे सुपर दिन यायचा योग आला आहे. जिल्हा ठिकाण झाल्यास आटपाडी शहराला चौफेर विकासाचे प्रचंड स्वरूप येवू शकते . हतबल राहिलेली, ठेवली गेलेली आटपाडी व तालुका, माणदेश जिल्ह्याचे, जिल्हा ठिकाण म्हणून आटपाडीचा निर्णय झाल्यास सर्वार्थाने पुढे जाणार असल्याने काही जणांची अस्वस्थता वाढीस लागली आहे. याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली .
या संभाव्य क्रांतीकारी निर्णयातून आटपाडीची सर्व बाजूची उपेक्षा नष्ट होऊन आटपाडीला विकासाचे मोठे दालन उघडू शकते .
ओरोस हे छोटेसे गाव, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा ठिकाण बनत असेल तर, या ओरोस पेक्षा खुप मोठी, प्रगत, डेव्हलपमेंट साठी मोठा वाव असणारी आटपाडी आहे . आटपाडीतून ३ राजमार्ग जात आहेत . ३ राष्ट्रीय महामार्ग आटपाडी पासून १० ते ३० किमी अंतरावरून जात आहेत . यापैकी एक राष्ट्रीय महामार्ग गेला आहे . आणखी दोन राष्ट्रीय महामार्ग लवकरच साकारत आहेत, याचा मोठा फायदा आटपाडीला होत आहे . माणदेश जिल्ह्यात समाविष्ट होणाऱ्या सर्व तालुक्यात, आटपाडी मध्यवर्ती ठिकाणी येते आहे . जिल्हा स्तरावरील अनेक कार्यालये उभारणीसाठी आटपाडी शहराच्याच हद्दीत १०० एकरापेक्षा जास्त गायरानाची शासकीय जमीन उपलब्ध होवू शकते. शिवाय आटपाडीच्या मध्यवर्ती ठिकाणाच्या २० हून अधिक एकरातील शासकीय जमीनीवरील अतिक्रमण काढल्यास ही जमीनही उपलब्ध होवू शकते . देवस्थान इनाम वर्ग ३ च्या काही जमिनीचे चुकीचे व्यवहार रद्द केल्यास यातूनही ५ - १० एकर अतिशय मोक्यावरची जमीन उपलब्ध होवू शकते.
शतकापासून माणदेशाचे केंद्रबिंदु आटपाडीच राहीली आहे . औंध संस्थानचा मुख्य महाल असणाऱ्या आटपाडीचे संस्थानच्या मंत्रीमंडळात दोन मंत्रीही होते . आजअखेर अनेक मोठ्या घडामोडी या आटपाडीतून झाल्या आहेत . उदाहरणार्थ, क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडीं, डॉ. भारत पाटणकर यांच्या १३ दुष्काळी तालुक्याचे पाणी लढ्याचे मुख्य केंद्र आटपाडी होते व आहे . दिवंगत नागनाथअण्णा नायकवडी, डॉ. भारत पाटणकर , दिंवगत माजी मंत्री गणपतरावआबा देशमुख सांगोला, दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर .आर . आबा पाटील तासगांव यांच्यासह १३ दुष्काळी तालुक्यातील अनेक नेत्यांच्या नेतृत्वाखालीच प्रचंड मोठ्या २० हून अधिक पाणी परिषदा " आटपाडीतूनच " झाल्या आहेत .
माणदेश जिल्ह्याचे, जिल्हा ठिकाण आटपाडीच का व्हावे ? या बाबतची सविस्तर माहीती त्यांनी यापूर्वीच प्रींट मिडीया सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वासमोर मांडली आहे . जिल्हा ठिकाण आटपाडी होण्याची हाता तोंडाशी आलेली संधी, आटपाडी तालुका वाशीयांच्या हातून गेली तर काळ आटपाडी तालुका वाशीयांना माफ करणार नाही . जागे व्हा . आवाज उठवूया, एकत्र येवू या आणि आपली न्याय भूमिका शासन दरबारी पटवून देण्यासाठी शासन कर्त्यांकडे वेगवेगळ्या प्रकारे पाठपुरावाही करूया . जनतेत प्रचंड जागृती व्हावी म्हणून माझे विस्तृत लेखन सर्वत्र पोहोचवुया . एकमेकांशी चर्चा करत, सर्वत्र माहोल तयार करू या, असे आवाहनही सादिक खाटीक यांनी केले आहे .

0 Comments