गादेगाव - टिम कृषीदीप न्यूज
गादेगांव परिसरात बरड वस्ती येथे आज पहाटे ०३ च्या दरम्यान कै.शिवाजी चिंतामणी बागल यांच्या शेतात बिबट्या दिसून आला असून यावेळी त्यांने गोठ्यातील साधारण एक ते दीड वर्षाच्या एका कालवाडाची शिकार केलेली आहे. अक्षय शिवाजी बागल हे रात्री विहिरीवरची मोटार बंद करण्याकरता गेल्यानंतर त्यांच्या जनावराच्या गोट्यासमोरच एक कालवड फस्त करत असलेला एक बिबट्या आढळून आला. हे दृश्य समोर बघितल्यानंतर अक्षयने तिथून पळ काढत आपला भाऊ विकास बागल व अतुल गायकवाड यांना कल्पना दिली. यानंतर त्यांनी मा.ग्रा.सदस्य गणेश बागल यांना कळवल्यानंतर त्यांनी वनविभागाच्या अधिकारी व महसूल प्रशासनाशी संपर्क साधून माहिती दिली. तहसिलदार श्री.सुशिल कुमार बेल्हेकर यांनी या घटनेची वस्तुस्थिती जाणून घेऊन योग्य त्या सूचना दिल्या आहेत. वनविभागाने वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती चैत्राली वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपले कर्मचारी वनपाल भुई, वनसेवक दिलखुश मणेरी व शकील मणेरी यांना पाठवून पायाचे ठसे व हल्ल्याची तीव्रता बघता सदरची शिकार ही बिबट्यानेच केली असल्याचे निष्पन्न केले. सदर हल्ल्याच्या ठिकाणी वन विभागाच्या वतीने ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यासाठी वन विभागाने लोकांनी जागृत रहावे, एकट्याने न भिरता मिळून फिरावे, सोबत काठी अथवा हल्ल्यापासून बचाव करता येईल असे हत्यार सोबत बाळगावे असे आवाहन केले आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे गादेगांव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा असे आवाहन गणेश बागल यांनी केले आहे. घटनास्थळी मा.ग्रा.सदस्य गणेश बागल, तलाठी समीर पटेल, विकास बागल, अतुल गायकवाड, निलेश भोसले, भारत बागल, तानाजी बागल, सिताराम बागल, संदीप बागल, बापू बागल, अनिकेत बागल, सचिन बागल आदींनी भेट देऊन पाहणी केली.



0 Comments