मंगळवेढा - टिम कृषीदीप न्यूज
जगातील सर्वात मोठ्या हेल्थकेअर आयुष्मान भव: योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी आरोग्य विभागाने सेवातत्पर रहावे अशा सूचना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिल्या आहेत. आयुष्मान भव: या आरोग्य सप्ताह अभियानाचा शुभारंभ आमदार आवताडे यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे संपन्न झाला. त्याप्रसंगी आमदार आवताडे हे बोलत होते.
पुढे बोलताना आमदार आवताडे यांनी सांगितले की, १३ सप्टेंबर पासून देशात 'आयुष्मान भवः' मोहिमेस सुरुवात झाली असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशपातळीवर या मोहिमेचा शुभारंभ केला. देशवासियांच्या निरोगी आयुष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली आयुष्मान भव: मोहिम विविध उपक्रमांच्या माध्यमातून देशभर पसरत आहे. आयुष्मान कार्डच्या माध्यमातून सामान्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे शक्य होणार असून यासाठी 'आयुष्मान भव:' ही महत्वांकाक्षी मोहीम १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत राबविली जाणार आहे. मोहिमेत पात्र लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड नोंदणी करून त्याचे वितरण करण्यात येणार आहे. ही मोहीम राबवतांना गावपातळीपर्यंत गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा देणे गरजेचे आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी, रक्तदान मोहिम, अवयवदान जागृती मोहिम, स्वच्छता मोहिम, १८ वर्षांवरील पुरुषांची आरोग्य तपासणी अशा मोहिमा राबविण्यात येतील. राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणी नि:शुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहितीही आ आवताडे यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री आयुष्मान भव: अभियान म्हणजे
गरीब लोकांच्या आरोग्य सक्षमीकरणाचे प्रभावी माध्यम आहे. गोर-गरीब जनतेच्या सदृढ आरोग्य जडणघडणीसाठी या अभियाना अंतर्गत विविध मार्गदर्शक तत्वे आणि आहार-विहार मूल्ये यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. सदर अभियानाच्या सार्वजनिक प्रसारासाठी आरोग्य विभागाने विविध सामाजिक उपक्रमांचा अवलंब करावा असेही आमदार आवताडे यांनी सांगितले.
सदरप्रसंगी माजी सैनिक संघटना तालुका उपाध्यक्ष मुरलीधर घुले, ग्रा.पं.सदस्य संजय माळी, डॉ. जानकर, सुनिल जाधव, यांचेसह आरोग्य विभागातील अधिकारी, पदाधिकारी, आरोग्य सेवक आणि कर्मचारी उपस्थित होते.



0 Comments