Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

माघी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न पंढरीत सुमारे चार लाखांहून अधिक भाविक दाखल

 


 

 

पंढरपूर- ( टिम कृषीदीप न्यूज )

माघी  शुध्द जया एकादशी निमित्त मंदीर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्यपूजा संपन्न झाली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीच्या सदस्या शंकुतला नडगिरे यांनी कुटुंबियासमवेत  तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदीर समितीचे सदस्य डॉ. दिनेश कदम यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. माघी एकादशी निमित्त श्री.विठ्ठल-रक्मिणीच्या दर्शनासाठी सुमारे चार लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत.  माघी एकादशी निमित्त मंदीरात विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे.

 


माघी एकादशीला  राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून सुमारे चार लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदीर समितीच्यावतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून, समितीच्या वतीने दर्शनरांगेत व दर्शन मंडपात, स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये, लाईव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कायमस्वरूपी व तात्पुरत्या स्वरूपात 100 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.दर्शनरांग दर्शनमंडप,  मंदीर व मंदीर परिसर  या ठिकाणची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी मंदिर समितीच्या वतीने विमा काढण्यात आला आहे. श्री. संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप येथे चौकशी कक्ष उभारण्यात आला आहे. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड व तेलगू भाषा अवगत असलेले कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. दर्शनरांगेत मोफत खिचडी व चहा वाटप करण्यात येत आहे. चंद्रभागा वाळवंट व पत्राशेड येथे महिला भाविकांच्या सोईसाठी चेंजिंग रूम व दर्शनरांगेत हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. 65 एकर, नदीपात्र, प्रदक्षिणामार्ग, मंदीर परिसर व शहरातील इतर ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.



हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात अवघी पंढरी नगरी दुमदूमून गेली आहे. पहाटेपासून चंद्रभागेचे पवित्र स्नान करून परंपरेनुसार शेकडो वारकरी  दिंड्यासह प्रदक्षिणा मार्गावर विविध संतांचे अभंग म्हणत प्रदक्षिणा पुर्ण केली. भाविकांनी चंद्रभागा स्नान,नगरप्रदक्षिणा, कळस दर्शन  तसेच श्री.विठ्ठल-रुक्मिणी मातेचे  पददर्शन व मुख दर्शन घेतले. चंद्रभागा वाळवंट,  65 एकर, मंदिर परिसर भाविकांसह  टाळ  मृदूंगाच्या जयघोषाने दुमदुमून निघाला आहे.

                                                 


Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement