पंढरपूर- ( टिम कृषीदीप न्यूज )
शैक्षणिक जीवनामध्ये उराशी बाळगलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपल्या प्रयत्नांची बाजी लावा आणि यशाला गवसणी घाला असा मार्मिक यशाचा मंत्र सोलापूर जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिला आहे. स्व महादेवराव बाबुराव अवताडे प्रतिष्ठान मंगळवेढा यांच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक शाळेमध्ये इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या तसेच पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सत्कार सोहळा पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थस्थानी सोलापूर जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार आवताडे यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व स्कुलबॅग अशा रूपामध्ये सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. सामाजिक राजकीय व गुणात्मक परिवर्तनाची मशाल सामाजिक क्रांतीच्या माध्यमातून परिपूर्ण करण्यासाठी शिक्षण हे प्रभावशाली माध्यम आहे. त्यामुळे कौशल्यपूरक शिक्षण घेऊन आपल्या व्यक्ती जीवनाचा लौकिक समृद्ध करा आणि आई-वडीलांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना जागृत करा असे मनोगत आमदार आवताडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. तालुक्यातील सामाजिक, राजकीय, धार्मिक, अध्यात्मिक व शैक्षणिक आदी सेवा क्षेत्रामध्ये समाजपयोगी उपक्रम राबवून या प्रतिष्ठानने नेहमीच सामाजिक सेवेची परंपरा जतन केल्याचेही आमदार आवताडे यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आभासी जगातील गोष्टींच्या आहारी जाऊन आपला अनमोल वेळ वाया घालवू नका व आपल्या स्वप्नांपासून दूर जाऊ नका. मानवी आयुष्यातील सर्वात दमदार आणि मजबूत काळ म्हणजे तारुण्य असल्यामुळे आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी व आकार देण्यासाठी हा अतिशय सर्वोत्तम कालखंड आहे. जगामध्ये ज्यांनी यशाची माळ आपल्या गळ्यात घालून घेतली त्यांनी गतकाळामध्ये खूप मोठा संघर्ष केला आहे. त्यामुळे यशाला शॉर्टकट न शोधता आपले प्रयत्न सातत्यपूर्ण मार्गाने कायम ठेवून यश आपल्या पदरात पाडून घ्या त्यासाठी स्व.महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठान सारखे अनेक हात आपल्या मदतीसाठी सदैव पुढे येतील असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्राचे लोकप्रतिनिधित्व करत असताना आमदार आवताडे यांनी नेहमीच गुणवत्तेच्या साधनेला प्राधान्य देऊन गुणात्मक परिवर्तनाचा आदर्शवत आयाम प्रस्थापित केल्याचेही ठोंबरे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
दहावी - बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी आपली शाखा निवड करताना आपली शैक्षणिक आवड लक्षात घेऊन करिअर निवडा असे प्रांताधिकारी गजानन गुरव साहेब यांनी सांगितले.
प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी कु.रोहिणी बाणकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विविध पैलू उलगडून सांगताना त्यांच्या यशाची संघर्षगाथा विद्यार्थ्यांसमोर मांडली. इतरांशी स्पर्धा न करता आपणच आपल्याशी स्पर्धा करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विधायक मार्गाने विकास केला पाहिजे असेही कु.बाणकर यांनी सांगितले.
जिद्द, चिकाटी व सातत्य यांची खूणगाठ मनाशी बांधून आपले स्वप्न साकार करण्यासाठी चांगल्या गोष्टी आत्मसात करा आणि आई-वडीलांचे नाव उज्वल करा असा सल्ला उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमाप्रसंगी स्व. महादेवराव आवताडे प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित गुणगौरव सोहळा कार्यक्रमावेळी प्रांत अधिकारी गजानन गुरव, पोलीस उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी कु.रोहिणी बाणकर, मा.उपसभापती श्री. विजयसिंह दादा देशमुख,श्री. दत्ता काळे महाराज,नगरसेविका शकुंतला नडगिरे, सरपंच श्री.मोहन आप्पा बागल, गट नेते समाधान घायाळ,श्री. प्रगतशील बागायतदार तुकाराम आबा कुरे,श्री. शांतिनाथ बागल एलआयसी,श्री.विनोद राज लटके,श्री.प्रसाद भैया कळसे,श्री. आबा पाटील,श्री.शेखर बंटी भोसले, हनुमंत ताटे,लक्ष्मण जाधव,श्री. दत्तात्रय रोंगे पाटील,श्री. संतोष डोंगरे, कलूबरमे सर,शरीफ शेख,दत्ता कोळेकर,श्री.दादा घायाळ, बापुसाहेब कदम, ग्रां. प स.समाधान देठे,सरपंच बंडू पाटील,श्री.भास्कर घायाळ,दत्ता यादव, जगन्नाथ जाधव, माऊली हळनवर,दीपक भोसले, किशोर जाधवनितीन करंडे,श्री.प्रवीण पिसाळ, श्री.राहुल गावडे श्री पांडुरंग वाडेकर, अतीक मुलाणी, दादासो मोरे मेंबर,सुनील रणदिवे,श्री. प्रथमेश बागल,सुनील ननवरे, स्व महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आदी मान्यवर व तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची अध्यक्ष निवड भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री बादलसिंह ठाकूर यांनी केली तर प्रास्ताविक श्री.विनोद लटके,यांनी केले. विशेष सहकार्य गटशिक्षणाधिकारी श्री मारुती लिगाडे, श्री.संभाजी कुरें गुरुजी व श्री.देशमुख सर,यांचे लाभले, कार्यक्रमाच्या शेवटी श्री.प्रसाद भैया कळसे यांनी सर्वांचे आभार मानले.

0 Comments