पंढरपूर - ( टिम कृषीदीप न्यूज )
तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये भरणाऱ्या चार प्रमुख यात्रा काळात तसेच शेतीपूरक मालवाहतुकीसाठी तालुक्यातील भीमा नदीपात्रावर अजनसोंड ते मुंढेवाडी असा पूल बांधावा अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी केली.
पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड ते मुंढेवाडी पुल बांधल्यास त्या भागातील शेतकऱ्यांची ऊसाची वाहतुक, शेतमालाची वाहतूक, अन्य कृषी उत्पादने व शेतीपुरक मालाचे विक्रीसाठी दैनंदिन वाहतुक सुलभ होणार आहे.
तसेच तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये मोठ्या प्रमाणात चार मोठ्या वाऱ्या भरतात. यावेळी भाविकांची मोठी गर्दी असते. त्यावेळी शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी, भाविक यांची सोय होण्याकरीता भिमानदीवर पुल बांधणे गरजेचे असल्याचे प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले.
पंढरपूर शहरालगत वाखरी ते देगाव या रिंगरोडचे (बायपास) रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत सुरू आहे. परंतु देगाव – शेगावदुमाला – अजनसोंड – मुंढेवाडी – कोंढारकी – अनवली - कासेगाव - कोर्टी पर्यंतच्या रिंगरोडचे काम अद्याप पर्यंत झालेले नाही. परंतु भविष्यात हा रिंग रोड होण्याची शक्यता आहे. या रस्त्यावरील अजनसोंड ते मुंढेवाडी पुलाचे काम झाल्यास वारी काळात या रस्त्याचा वापर होणार आहे. तसेच सुस्ते – देगाव – शेगावदुमाला – अजनसोंड – मुंढेवाडी – कोंढारकी – अनवली यापरिसरातील नागरिकांना या पुलाचा वाहतुकीसाठी व शेतीमालाच्या वाहतुकीस उपयोग होणार आहे. तसेच अहमदनगर - बार्शी – कुर्डुवाडी – सोलापूर - विजापूर - कोल्हापूर - सांगली याभागातून येणाऱ्या लांब पल्यांच्या वाहतुकीसाठी हा पर्यायी मार्ग म्हणून उपलब्ध होणार असून वाहतुक कोंडीचा अडथळा दुर होणार आहे.
त्याअनुषंगाने सार्वजनिक बांधकाममंत्री मा.ना.श्री.रविंद्र चव्हाण यांचेकडे भिमानदीवरील अजनसोंड ते मुंढेवाडी पुल बांधणेसाठी लेखी निवेदनाव्दारे मागणी केली असल्याची महिती मा.आ.प्रशांत परिचारक यांनी सांगितले. यावर सार्वजनिक बांधकाममंत्री यांनी सकारात्मकता दर्शविली.
0 Comments