केंद्रीय गृहराज्य मंत्री श्री अजयकुमार मिश्रा यांचेकडे भाजपा जावलीची मागणी.
सातारा- ( टिम कृषीदीप न्यूज )
केंद्रीय गृहराज्यमंत्री मा.ना.अजयकुमार मिश्रा हे दोन दिवसाच्या सातारा लोकसभा प्रवास दौऱ्यावर आले आहेत. या वेळी कोरेगाव येथे भाजपा कोअर कमेटी व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली. तद्नंतर झालेल्या चर्चेत भाजपा जावली तालुकाध्यक्ष व अटल पर्यटन सहकारी संस्थेचे चेअरमन श्रीहरी गोळे यांनी मंत्री महोदयांकडे जावली तालुक्यास पर्यटन तालुका घोषीत करण्याची मागणी केली. जागतिक वारसास्थळ असलेले कास पठार , सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयना जलाशय, कन्हेर , महू- हातगेघर धरण क्षेत्र परिसरात लाखो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. यामुळे स्थानिक युवकांना खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराची व उद्योगधंद्याची संधी उपलब्ध आहे. तसेच लगत असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात ही जावलीतूनच पर्यटक जातात. पजावली तालुक्यास पर्यटन तालुका घोषीत केल्यास विभागाच्या माध्यमातून विविध पायाभूत सोई सुविधा निर्माण होऊ शकतील. तसेच हॉटेल, बोटिंग, वॉटर स्पोर्ट,वन व कृषी पर्यटनासारख्या व्यवासायास चालना मिळेल. केंद्र शासनाचा पर्यटनाचा निधी मोठ्या प्रमाणात वापरता येईल. तसेच शहरी भागातील पर्यटकांना ही याचा सुलभपणे लाभ मिळेल.
तरी जावली तालुक्यास लवकरच पर्यटन तालुका घोषित करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा हे केंद्रीय पर्यटन विकास कमेटीचे सदस्य म्हणून ही काम पहात असल्यामुळे या निवेदनाचा सकारात्मक विचार करून पुढील कारवाई साठी हे निवेदन पाठवले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी प्रदेश सचिव विक्रम पावसकर, जिल्हा संघटन सरचिटणीस शेखर वढणे,तालुका भाजपा सरचिटणीस किरण भिलारे उपस्थित होते.

0 Comments