पंढरपूर -  (टिम कृषीदीप न्यूज )

 प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात माढा व पंढरपूर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, करकंब येथे आयोजित जनआक्रोश सभेला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रकल्पाविरोधात ठाम भूमिका घेतली. या सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी निर्णायक लढा उभारण्याचे आवाहन केले.


यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले की, शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर घाला घालणारा प्रकल्प असून, सुपीक शेती जमीन गमावण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. "देशाच्या संविधानाने नागरिकांना आपल्या हक्कांसाठी लढण्याचा अधिकार दिला आहे. शेती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे," असे त्यांनी नमूद केले.

सभेत उपस्थित शेतकऱ्यांनी प्रकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत, संयुक्त मोजणी प्रक्रियेला विरोध दर्शविण्याचा निर्धार व्यक्त केला. करकंब परिसरातील सुमारे 400 एकर द्राक्ष बागायतदार तसेच 100 हून अधिक शेततळी बाधित शेतकऱ्यांनी एकजुटीने या प्रकल्पाविरोधात वज्रमूठ उगारली.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शक्तीपीठ महामार्ग हा जनतेच्या गरजेपेक्षा काहींच्या आर्थिक फायद्यासाठी राबवला जात असून, यामुळे गावांची फाळणी होऊन सामाजिक व आर्थिक नुकसान होणार आहे. पूर्वी रेल्वे मार्ग गेल्यानंतर जसा शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ झाला नाही, तसाच अनुभव या महामार्गामुळे येण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

यावेळी काही शेतकऱ्यांनी सरकारकडे ठेकेदारांची प्रलंबित बिले तत्काळ देण्याची मागणी केली. "मोठ्या प्रकल्पांवर हजारो कोटी रुपये खर्च करण्याऐवजी प्रलंबित कामांची देणी भागवावीत," अशी मागणी करण्यात आली.

सभेत उपस्थितांनी स्पष्ट केले की, पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक असलेल्या मार्गांना त्यांनी कधीही विरोध केला नाही. मात्र, सध्याचा शक्तीपीठ महामार्ग हा गरजेपेक्षा वेगळ्या हेतूने राबवला जात असल्याचा आरोप करण्यात आला.

दरम्यान, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या प्रश्नावर शेतकऱ्यांसोबत उभे राहत नसल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली. "हा लढा शेवटपर्यंत सुरू ठेवला जाईल," असा निर्धार उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

यावेळी स्वाभिमानीचे शिवाजी पाटील सचिन पाटील तानाजी बागल बापू मेजर विजय रणदिवे, सचिन अटकळ, सत्यवान गायकवाड शहाजहान शेख नामदेव कोरके, विजय शिंदे, सिद्धू घुगे सभेला मोठ्या संख्येने शेतकरी, बागायतदार व स्थानिक नागरिक उपस्थित होते.